कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर – कोल्हापुरातील एक महान क्रिकेटपट्टू
स्वातंत्रपूर्व काळात कोल्हापुरात कुस्ती या खेळाला राजाश्रय मिळाल्याने कुस्ती कोल्हापूरच्या मातीत रुजत गेली व वाढीस लागली. परंतु हे होत असतानाच भारतात खऱ्या अर्थानी क्रिकेट हा खेळ इंग्रजांनी आणला मात्र भारतीयांनी तो इथल्या मातीत रुजवला. भारतात या खेळाच्या प्रसाराचे कार्य पुढे बऱ्याच क्रिकेटपट्टून्नी केले. पुढे स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात कोल्हापुरात हि कुस्ती पाठोपाठ क्रिकेट हा खेळ वाढीस लागला होता. कोल्हापुरात क्रिकेट हा खेळ लोकप्रिय होण्यामागे कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. रणजी क्रिकेट मध्ये विक्रमवीर असणारे कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर वयाच्या १५ व्या वर्षीच शाळेच्या टीमचे कॅप्टन झाले. त्यांचे भाऊ रावसाहेब निंबाळकर हे देखील रणजी सामने खेळलेले होते. त्यांचा पहिला रणजी सामना १९३९ साली बडोद्याविरुद्ध पुणे येथे झाला होता. भाऊसाहेब हे राईट आर्म म्हणजेच उजवीकडून फलंदाजी करत. तसेच ते मध्यम गतीचे गोलंदाज हि होते व काही वेळेला ते विकेटच्या मागे यष्टी रक्षणही करत होते. भाऊसाहेब निंबाळकरांची फलंदाजी खूप तडाखेबाज आक्रमक व शैलीदार पद्धतीची होती. पुणे येथे महाराष्ट्र विरुद्ध काठियावाड रणजी सामन्यामध्ये भाऊसाहेब निंबाळकर यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून काठियावाड संघाविरुद्ध ४४३ धावा काढल्या होत्या. भाऊसाहेब निंबाळकरांना सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम तोडण्याकरिता फक्त ९ धावांची गरज होती. मात्र त्या वेळी काठियावाड संघ सामना सोडून पळून गेले होते. या कार्याची दाखल घेत सर डॉन ब्रॅडमन यांनी निंबाळकरांना त्यांच्या या खेळीसाठी कौतुकाचे पत्रही पाठवले होते. भाऊसाहेबांच्या क्रिकेट करीअर मध्ये त्यांनी एकूण ८० सामन्यांमध्ये १२ शतके,२२ अर्ध शतके व ४,८४१ धावा केल्या. काही काळ ते होळकर, राजस्थान, बडोदा व रेल्वेकडूनही क्रिकेट खेळले होते. कोल्हापूरच्या छत्रपती घरान्याशी त्यांचे चांगले संबंध होते. भाऊसाहेब काही काळ छत्रपती शहाजी महारांकडे एडीसी म्हणूनही कार्यरत होते. पुढे ते रेल्वे खात्यातून पोलीस उपअधीक्षक पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही भाऊसाहेब क्रिकेट या खेळाशी जोडले गेले होते. कोल्हापूर मध्ये त्यांना विक्रमांचा बादशाह म्हणूनही ओळखत.



